Showing posts with label विविध अंकातून प्रसिद्ध कविता. Show all posts
Showing posts with label विविध अंकातून प्रसिद्ध कविता. Show all posts

March 24, 2020

डोळ्यातले ओले थेंब | कविता | अमोल पाटील

पेटलेल्या तनामधुनी
थेंब घामाचे गळती
राबणार्‍या मजुराला
माय धरित्री बोलती

हाती तुझ्या करामत
बंगले किती बांधला
पण अजूनी मजुरा
तू झोपडीत राहिला

नाही कळत नियम
मला तुमच्या जगाचे
मूल्य मातीमोल केले
दररोज मजूरांचे

तूझे हातावरी पोट
तरी मनी भारी दया
आज माणुसकी जीवंत
ही तुझीच किमया

बोल ऐकूनी धरत्रीचे
मजूर वाकला वाकला
डोळ्यातले ओले थेंब
दूर आभाळी फेकला

- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा द्वारा प्रकाशित 'मायमराठी' विशेषांक २०१९)

घास | कविता | अमोल पाटील

या देशाच्या समृृध्दीचा
शिलेदार शेतकरी
रोज रोज रानामंदी
राबनारा कष्टकरी

प्रत्येकाच्या हाती येथे
त्याच्या कष्टाची भाकर
नित्य शेतात राबुनी
भरी जगाचे उदर

नसे आराम कष्टाला
नित्य नियमित श्रम
गोड मानुनिया घेतो
देहाचे आजारपण

हा राबतो म्हणूनिया
जग सुखे तृृृृप्त होते
जेव्हा उगवितो धान्य
तेव्हा जगाला लाभते

याची ही नि:स्वार्थ सेवा
स्मरणात रे रहावी
घास अन्नाचा खाताना
त्याची कष्टं आठवावी

- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा द्वारा प्रकाशित 'मायमराठी' विशेषांक २०१७)

चळवळ | कविता | अमोल पाटील

कधी धावपळ कधी विसावा
मनी जागृृृतीचा भाव
सारे मिळूनी सदैव चालती
त्यासी चळवळ ऐसे नाव

चळवळीचे ध्येय हाती
त्यासी नेतृृृत्व संबोधिती
या नेतृृृत्वालाच पारखुनीया
सारे अनुयायी जमती

एक एक कार्यकर्ता
चळवळीचा स्तंभ असतो
चळवळ ही रूजते वाढते
याचा तो श्रेयदार असतो

चळवळीने समाजसंघ 
सदैव सारा जागा होतो
चळवळीनेच समाजस्तर
वैचारिकदृृष्ट्या उंच जातो

अशी समाजशिल्प घडविणारी
चळवळ नित्य फुलत रहावी
माणसातली माणूसकी वाढवूनी
समाजस्तर उंचावत रहावी

- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा द्वारा प्रकाशित 'मायमराठी' विशेषांक २०१६)

December 27, 2019

रोजगार | कविता | अमोल पाटील

माणसाच्या जगण्याला
महागाईचाच ताप
नाही रोजगार हाती
अन्नासाठी हापाहाप

गरिबी आणि श्रीमंती
दोघे इरेला पेटल्या
दरी वाढत चालली
नाही समस्या सुटल्या

काही दिस अगोदर
जिणं आनंदाचं होतं
गावं स्वयंपूर्ण होती
मनी समाधान होतं

प्रगतीच्या नावाखाली
लई पाणी वाहून गेलं
प्रगतीच्या उजेडाला
थोडक्यांनीच पाहिलं

क्षणभर रे थांबून
हिच वेळ चिंतनाची
निराधार झालेल्यांना
हात मायेचा देण्याची

पुरे झाली ती भाषणे
कृृृृतीशून्य आश्वासने
काम मिळो प्रत्येकाला
एवढेच गा मागणे

युवकांचा हाच प्रश्न
सगळ्यांनी ओळखावा
त्यांना भीक नको आहे
फक्त रोजगार हवा

- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : 'गीत' नाताळ अंक २०१९)

फास | कविता | अमोल पाटील

काय सांगू देवबाप्पा
गरिबाचं रे जगणं
थेंबाथेंबान रगत
जितेपनीच जाळणं

पोटा अन्नाची वानवा
जे मिळेल तेच सोनं
कणसाच्या दाण्यावर
येथे दलालाचं ध्यानं

कडब्यातच राबणं
कडब्यातच राहणं
काडी होऊन एकदा
कडब्यातच जळणं

सारी हयात राबून
शेती रास उगविली
परी राबणार्‍या पोटा
तिनं नाही शमविली

ऊठ पोशिंद्या जगाच्या
नको फास लावू गळा
तुझ्या मृृृत्यूचाही येथे
कुणा नाही कळवळा

- अमोल पाटील

(पूर्वप्रसिद्धी : ९ वे राज्याव्यापी शिक्षक साहित्य संमेलन (१४ डिसेंबर २०१९) विरार द्वारा प्रकाशित 'शिक्षकांच्या कविता' या काव्यसंग्रहातून...)

November 10, 2019

सुंदर शाळा | कविता | अमोल पाटील

सुंदर सुंदर शाळा
दिव्य ज्ञानाचे मंदिर
भविष्य उद्याचे घडविते
समृद्ध सोज्वळ सुधीर

ज्ञानयज्ञ अखंड चाले
चालते नैतिकतेचे सिंचन
मानवतेचे सर्व मुलांवर
मूल्य बिजांचे रोपण

धडे शिकूनी जगण्याचे
होती जगण्यासाठी तत्पर
जीवनयुद्धात सामर्थ्याने
पुढे-पुढे अग्रेसर

गुरुजी आणि ग्रंथांचा
सर्व मुलांना आधार
अक्षरातील मूल्य प्राशुनी
होती जीवने साकार

नाव करिती आईबाबांचे
आणि सुंदर शाळेचे
राष्ट्राला उंच उंच नेती
वेध घेउनी शिखराचे

- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा द्वारा प्रकाशित मायमराठी विशेषांक २०१५)

पोशिंदा | कविता | अमोल पाटील

झाली मेघ गर्जना
आता पाऊस येणार
माझा शेतकरी राजा
आता कंबर कसणार

उन्हावार्‍यात कष्टानं
सारं नांगरलं शेत
नांगरुन झाल्यावर
चाले पेरायचा बेत

दोन बैलाच्या जोडीनं
तयार झालय तिफन
आता सुरुवात झाली
करण्या बिजांच रोपन

कष्टा त्याच्या या पाहून
बरसला मेघराजा
बिजाचं अंकुर पाहून
सुखावला बळीराजा

उभं आयुष्य जगला
माझा शेतकरी राजा
साय मायेची चाखला
अवघ्या जगाचा पोशिंदा

जग बांडगुळ झालं
खांद्यावर हो दादाच्या
आज विसर पडियेला
माझ्या दादाच्या कष्टाचा

अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा द्वारा प्रकाशित मायमराठी विशेषांक २०१३)

November 04, 2019

सूर्य आणि बळीराजा | कविता | अमोल पाटील

सूर्य उगवतो जसा
नित्य नित्यची नेमाने
बळीराजा गा शेतात
तसा राबतो निष्ठेने

सूर्य प्रकाशितो धरा
संपतो अंधार सारा
युगे युगे तळपतो
असा सूर्याचा दरारा

येथे माझा बळीराजा
खूप कष्टतो, राबतो
त्याच्या कष्टाची रे फळे
सारं जगच चाखतो

सगळ्यांच्या आयुष्यात
यांनी प्रकाश आणला
थोर थोर नमस्कार
बळीराजा व सूर्याला

निर्मळ, निस्वार्थ सेवा
सार्‍या जीवांना तारक
सूर्य आणि बळीराजा
जीवितांचे उद्धारक

- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : गीत नाताळ अंक २०१७)