Showing posts with label मुक्त श्वास (काव्यसंग्रह). Show all posts
Showing posts with label मुक्त श्वास (काव्यसंग्रह). Show all posts

January 26, 2023

वारसा (कविता) - अमोल पाटील

इतिहासाचा वारसा
सदा जपला पाहिजे
जागर रे विचारांचा
सदा गुंजला पाहिजे

मनोमनी रे प्रेरणा
सदा जागृत पाहिजे
सरिता तत्वज्ञानाची
सदा वाहिली पाहिजे

तुझ्या माझ्या श्रमातूनी
फुलवू मळे ऐक्याचे
विविधरूपी एकता
हेच ब्रीद प्रगतीचे

करू पुस्तकांशी मैत्री
जाणू खर्‍याचे रे भान
मग आरंभू क्रांतीला
आणि जागवू रान

तुझं माझं हे कर्तव्य
इतिहास अभ्यासुया
आणि हा थोर वारसा
प्राणपणाने जपुया

© अमोल पाटील
(अमोल पाटील लिखित सन २०१८ मध्ये प्रकाशित 'मुक्तश्वास' या काव्यसंग्रहातून...)

March 25, 2022

मूठ | कविता | अमोल पाटील

गरिबा घरी जन्मलो
अशी भावना नसावी
गरिबाच्या पोरा तुझ्या
जिद्द उरात असावी

तुला जाणीव श्रमाची
आणि आस उद्याची
हेची तुझे रे सामर्थ्य
धग जग बदलण्याची

नको कोमेजू रे आत
उठ घेऊनिया बळ
दिव्य स्वप्न भर ऊरी
हो रे गरिबीचा काळ

भर तेज नजरेत
आणि बोलीत साखर
आठव रूप सूर्याचे
आणि चंद्रही प्रखर

विसरू नको ते क्षण
चटक्यात सोसलेले
हात धर आवळूनी
कर्तृत्वाने पोसलेले

© अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्तश्वास' या काव्यसंग्रहातून..)

March 24, 2022

लढाई | कविता | अमोल पाटील

रडण्यास थारा नाही
आम्हा हौस लढण्याची
थोर मानवी पताका
उंच फडकविण्याची

सज्जनाच्या रे पादुका
आम्ही वाहू आनंदाने
परी दुर्जनाची गय
आम्हाकडून न होणे

थोर सत्याची साधना
आणि न्यायाचा गजर
चळवळ तिच दिव्य
ठाई मानवता स्वार

ध्येय एक मार्ग एक
मानवी कवणे मनी
नोहेच थांबणे आता
जोवर श्वास जीवनी

एक विचार पेरला
उगवला सहस्त्राने
लढ लढाई मानवी
शब्द बोलले मनाने

© अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्तश्वास' या काव्यसंग्रहातून..)

March 21, 2022

अंतरीचे नभ | कविता | अमोल पाटील

सुख आनंदाचे क्षण
ज्याच्या त्याच्या हाती
विधात्याने देऊ केल्या
अंतरंगी दिव्य ज्योती

हा अंतरीचा प्रकाश
तारी उभ्या जीवनाला
अशा गोड प्रकाशात
भरती येई सुखाला

नाही कष्ट अपार
असा उपाय सुलभ
आनंदाचे रे किरण
पाहता अंतरी नभ

नाही कर्मकांड येथे
नाही भाबडा प्रचार
चित्ता स्थिर करण्याचा
असे येथला विचार

धावाधाव रे सरली
आणि सत्य उमगले
जेव्हा यत्ने प्रयत्नाने
नभा अंतरी पाहिले

- अमोल पाटील
( सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून..)

March 14, 2022

अंधाराला सारताना | कविता | अमोल पाटील

सेवा जनाची कराया
खुर्ची कशाला पाहिजे
अंधाराला सारताना
पद कशाला पाहिजे

असे दिवे मस्तकात
अहोरात्र उजळू द्यावे
खुर्ची पद येती जाती
का म्हणुनी मी थांबावे

खोट्या प्रतिष्ठेच्या पायी
नसेच जन्म आपुला
खोटे सुख उपजता
मग दोष द्या कशाला

शहाणपणा यातच
नको शान खोटारडी
दुबळ्यांसाठी धावावे
हर वक्त हर घडी

मग पहाट होईल
सोनेरी रे जीवनात
चोहिकडे फुले हसतील
या विश्वाच्या अंगणात

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून..)

March 10, 2022

व्यासपीठ | कविता | अमोल पाटील

मृगजळ नोहे जग
जग छान व्यासपीठ
काहीना याचा रे वीट
काहींसाठी हे विद्यापीठ

अंगी जशी कला तशी
येथे मिळते रे दाद
साद घालीता प्रेमाने
मिळे छान प्रतिसाद

शाळा पुस्तक मास्तर
संगे सवंगडी भारी
याहुनी काय जगती
महती असते न्यारी

येथे बक्षिसही मिळे
जनता करीते न्याय
पाचामुखी परमेश
कसा होईल अन्याय

अंती सत्य जय होई
जरी मार्ग खडतर
परि आनंद निराळा
सारे सुंदर सत्वर

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून..)

March 06, 2022

मुक्काम | कविता | अमोल पाटील

पाऊलेच ठरविती
येथला मुक्काम अंती
पाऊलागनिक वाढे
येथली गती प्रगती

प्रगती घेते भरारी
असता आरंभ भारी
एक एक वीट येथे
घरा देतसे उभारी

असा आगळा वेगळा
जगी मुक्काम असावा
असण्याने आपल्या रे
जगती आनंद फुलावा

जगणेच नित्य असे
प्रेमळ सोज्वळ व्हावे
सुखाचे सर्वत्र गाणे
ओठात गुणगुणावे

मुक्काम असा सुंदर
सर्वाना नित्य लाभावा
या मुक्कामी आनंदाचा
जीवनी मळा फुलावा

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून..)

March 05, 2022

सृजना | कविता | अमोल पाटील

सृजना तुला प्रणाम
तू कल्पतरू जगाचा
जगणे सुखी कराया
तुझा जन्म संघर्षाचा

शोधिलेस बहू यंत्र
जगणे सुलभ झाले
तुझ्याच विचारातुनी
नव युग प्रकटले

तुझ्या संघर्षाची फळे
आज सारेच चाखती
ध्येयवेडेपणा तुझा
तू लाविलास सार्थकी

निर्मिक म्हणुनी तुज
मला पाहावे वाटते
कारण तुझी निर्मिती
जगास सुखी करते

धैर्यवान विद्यावान
हेची भविष्य जगाचे
सृजनाच्या बुद्धितूनी
स्वप्न साकारे उद्याचे

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून..)

March 04, 2022

मार्ग | कविता | अमोल पाटील

भलेही जाळे जटिल
परि हार न मनाची
आणीन सुवर्ण दिन
हिच आस उद्याची

मन साकार साकार
परिस्थितीचा होकार
अंधारमय जीवनाला
हा उजेडाचा हुंकार

मार्ग मानवी लौकिक
सर्वांपरी अलौकिक
येथ तेच चिकटले
सदा चिंतीती तात्विक

येथे उशिर कशाला
हर घडी असे भारी
अशा महान कार्याला
श्रमाच्या पाडाव्या सरी

जुलूम अन्याय मुक्त
अशी धरा उभारावी
हातात हात गुंफुनी
सुंदर सकाळ यावी

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून..)

March 03, 2022

तेज | कविता | अमोल पाटील

समस्या जरी अनेक
एक उपाय शोधुया
अंधार हा भयानक
एक ज्योत उजाळूया

अंधाराचे नाही भय
आम्हा साथ किरणांची
हुडकुनी काढू वाटा
हीच हाक प्रकाशाची

उज्वल दिव्य प्रहरी
मग पहाट होईल
एक एक काजव्याला
भव्य तेज रे येईल

आता फुकाचा क्षण
मोजण्यास उसंत नाही
करावेच कर्म येथे
यात आता भ्रांत नाही

सोहळे असे युगाचे
पाहूनी धन्यता वाटे
अशा चमूत राहूनी
मज सुख नित्य भेटे

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्तश्वास' या काव्यसंग्रहातून..)

March 02, 2022

गावगाडा | कविता | अमोल पाटील

परस्परांच्या साह्याने
हाकिती श्रमाचा गाडा
भोळ्या भाबड्या मनाने
नित्य चाले गावगाडा

एकमेकांना आधार 
करी सर्वांचा उद्धार
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
सार्‍या गावाचा विचार

प्रगतीच्या नव्या वाटा
युवकांना खुणविती
नवे नवे उपक्रम
युवाशक्ती राबविती

वृद्धजनांचा आधार
सार्‍या गावाला वाटतो
सुख दुःख गुजगोष्टी
अनुभव कामा येतो

अशा गावी नित्य सदा
पडे प्रगतीचा सडा
जेव्हा नांदे आनंदाने
पायी पायी गावगाडा

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून...)

May 28, 2021

मुक्त श्वास | कविता | अमोल पाटील

 निरागस सारा वारा
सांगे गुज हळुवार
म्हणे जगा माझ्यासम
फेकत हास्य तुषार

तेजस्वी स्वर्ण प्रकाश
सांगे सूक्ष्म सावकाश
म्हणे जगा माझ्यासम
तोडू अंधाराचा फास

शुध्द निराकार पाणी
सांगे अलगद कानी
तृप्त करी जो सर्वाना
तोची तृप्त रे जीवनी

शांत संयमी माती
सहज सांगे एकांती
उचल पाऊल वीरा
गाडून टाक रे भीती

आता शेवटी आकाश
सांगे घेत मुक्त श्वास
सेवाधर्म जगी मोठा
बाकी सगळा आभास

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून...)

May 23, 2021

काव्य ईश | कविता | अमोल पाटील

कवितेविण जग हे
शून्य होते शून्य आहे
प्रेम माया माणूसकी
सदा काव्यातूनी वाहे

डुले काव्यासंगे वृक्ष
वाहे काव्यासंगे नदी
लव लव निसर्गाची
सांगे काव्यमय नांदी

आदि काव्य अंत काव्य
देवादिकांच रे रूप
नित्य नवा रे आनंद
याच्या संगती अप्रूप

काय मागू आणिक
काव्य सान्निध्य लाभले
काव्यदृष्टीने या जगा
हळुवार मी पाहिले

तवा आलं माझ्या ध्यानी
काव्य ईश सर्वश्रेष्ठ
प्रतिभेच्या सान्निध्यात
झालासे रे प्रविष्ट

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून..)

March 04, 2021

माहेर | कविता | अमोल पाटील

जन्मदात्री थोर माय
आणि जन्मदाता पिता
किती कौतुक सांगावं
अशी माहेरची कथा

मन अधीर अधीर
माहेराला जाण्यासाठी
बालपणीच्या मैत्रिणी
उमलती गच्च गाठी

अशी माहेराची कथा
माहेरवाशिणी सांगे
मन आनंदून जाई
जेव्हा माहेराला निघे

बहू दिस डोळा पाहू
मायबापा बंधू सखी
सार्‍या माझ्या आप्तजना
हृदयात करू बंदी

मन आनंदून जाई
अन्नपाणी आठवेना
क्षण वरीस वाटतो
नित्य माहेरी जाताना

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून...)

December 25, 2020

अभ्यासू विद्यार्थी | कविता | अमोल पाटील

अभ्यासूची नीती थोर
जगी सकळ क्षेत्रात
जया अभ्यासाची गोडी
तोच पुढे रे सर्वात

सत्ता सेवा सर्वकाही
अभ्यासाविना निष्फळ
यत्ने अभ्यास करता
वाढे अंतरीचे बळ

अभ्यासासी रे पर्याय
काही असतंच नाही
जो युगंधर सेनानी
सदैव अभ्यासू राही

अभ्यासता उमगते
अभ्यासाने समजते
अभ्यासातूनी कळते
अभ्यासाने ज्ञान येते

सदा अभ्यासू विद्यार्थी
रचिती गा इतिहास
म्हणूनिया लाभो सर्वां
अभ्यासाचा सहवास

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून...)

November 01, 2020

पताका | कविता | अमोल पाटील

संस्कृतीचे साक्षीदार
येथे गडकिल्ले वाडे
गुंजले गर्जले यांत
थोर वीरश्री चौघडे

इतिहासाचा वारसा
समृद्ध करीतो मना
झुंजार थोर ते वीर
झुंजार तयांची सेना

लढाऊ परंपरेच्या
साठविल्या आठवणी
चिरेबंदी दगडाची
चिरेबंदी रे स्मरणी

पाहताच धन्य झालो
मंगल वारसा बाका
शोभते उंच त्यावरी
झुंजार अशी पताका

या पताक्याने जपली
नित्य अस्मितेची शान
थोर संस्कृतीच्या दारी
पताक्याची दिव्य खूण

©अमोल पाटील
(अमोल पाटील लिखित 'मुक्तश्वास' या काव्यसंग्रहातून)

October 29, 2020

मिरची भाकर | कविता | अमोल पाटील

शेती मैदाने डोंगर
प्राणी आणिक पाखरे
सुखे न्हाउनी निघती
पशु पक्षी संगे सारे

शेतकरी माझा दादा
पक्षी पाखरांचा साथी
काळ्या आईची लेकरे
अशी तयांची रे नाती

ऊन पाऊस पेलून
सोनं रानी उगविती
तोंडं लाख खावया
तेव्हा सोन्याला त्या येती

माझ्या दादाचं जगणं
श्रम कष्ठ रात दिस
मिरची भाकर ठेचा
हेच पक्वान्न वीस

तरी जगे आनंदानं
मनोमनी समाधान
बीज अंकुरुनी रोप
करी नव्याचं उत्थान

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून...)

October 06, 2020

मुंगीची जिद्द | कविता | अमोल पाटील

जिद्द शिकावी मुंगीची
जरी कितीही पडली
पुन्हा पुन्हा प्रयत्नाने
भिंतीवरी ती चढली

तिच्या चिवट श्रमाचे
किती गावे गोडवे
भारी शिस्तीत चालते
तिचे चालणे उजवे

सहकार्य गुण तर
जणू तिनेच निर्मिला
एकमेका सांभाळीती
जेव्हा जाती मोहिमेला

तिच्याकडे पाहताना
मन नम्र खूप होते
तिचे श्रमिक जीवन
आम्हां प्रेरित करते

इवलेसे तिचे रूप
परि महानता अंगी
जगताना कित्येकदा
प्रेरक अशी ही मुंगी

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून...)

गाव | कविता | अमोल पाटील

नदीकाठी वसलेलं
असं टुमदार गाव
डोंगर दरी आडून
येथे येई सूर्यदेव

गावा मध्यभागी एक
शाळा शोभे रे सुंदर
घडविते बालकांना
आणि आणीते बहार

एक कार्यालय भारी
तेथे बसे कारभारी
पाहे गावाची व्यवस्था
पाणी वीज दारोदारी

मोठे बुजरूक ज्ञानी
वृद्ध इसमांना मान
आया बहिणींना सदा
मिळे अखंड सन्मान

अशी सोज्वळ सुंदर
बहू मायदेशी गावं
जिथे नांदता मनाला
स्पर्शे स्वर्गीचा भाव

- अमोल पाटील
(सन २०१८ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'मुक्त श्वास' या काव्यसंग्रहातून...)