Showing posts with label इंद्रधनुष्य (काव्यसंग्रह). Show all posts
Showing posts with label इंद्रधनुष्य (काव्यसंग्रह). Show all posts

August 25, 2023

परतफेड | कविता | अमोल पाटील

 अंधार दाटला येथे
अंधार पेटला येथे
दिस संपती चिखलाचे
फूल उमलती जेथे

त्या चिखलानंच खाद्य
त्या फूलाला पुरवलं
चटके सोसत चिखलाचे
ते फूलही उमललं

तशीच कोळशाची खाण
जन्म हिर्‍याला घालीते
सारे आक्रोश पाजूनी
नव्या सुर्याला उगविते

त्या फूलानं हौसेने
पांग चिखलाचं फेडाव
त्या हिर्‍याने चटकन
अंधार्‍या खाणीत उजळाव

दीप सुवासाचे धडे
आरंभावे मुहूर्तमेढ
हिच त्यांच्या जीवनाची
उरल्या जगाला परतफेड

© अमोल पाटील
(सन २०१४ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'इंद्रधनुष्य' या काव्यसंग्रहातून...)

May 21, 2021

लेकरां माझ्या शहाणं करा | कविता | अमोल पाटील

गुरूजी माझ्या घरात मोठा
पेटून उठलाय वनवास
चार दिस असेच गेले
आयता लाभलाय उपवास

गुरूजी भूक पेटून उठलीया
खावं वाटतंय दगड गोटे
वनवासात या सैरावैरा
पूर अश्रूंचा नयनी लोटे

दिस असंच काढतोय गुरूजी
बघत आता ह्या लेकरांकडे
चार अक्षर शिकवा त्याला
सुंदर हाकण्या जीवनगाडे

राब राब राबतोय गुरूजी
या पोरांच्या शाळेसाठी
घाम गाळताना मज आठवते
मी सोडलेली शाळेची पाटी

लाकूड फाटा दगड गोटा
गुरूजी ह्यातच माझं आयुष्य
लेकरा माझ्या शहाणं करा
आणण्यासाठी नवं भविष्य

कारभारणीही राब राबते
बोलत असते क्षणाक्षणाला
पोरगं आपलं शिकेल नक्की
हुशार लई म्हण शिक्षणाला

गुरूजी माझं म्हणणं एकच
लेकरू माझं हुशार व्हावं
बुध्दी मनानं होऊनी मोठं
नैतिक समाज घडवत रहावं

© अमोल पाटील
(सन २०१४ मध्ये प्रकाशित 'इंद्रधनुष्य' या काव्यसंग्रहातून)

May 09, 2021

आई तूच माझा आदर्श | कविता | अमोल पाटील

कितीही दूर असलो
तुला मनी अनुभवतो
आदर्श तूची माझा
आई रोज आठवितो

जीवनाला अर्थ देऊनी
जगण्याचं बळ दिलंस
नीतीमूल्याचे धडे शिकवूनी
शांतीचा उपदेश केलास

जीवनगाडा हाकताना
माणूसकीला फुलवायला सांगीतलंस
सुख दुःखाच्या नाजूक क्षणी
संयम बाळगायला शिकवलंस

जीवनात स्वतः जगताना
इतरांना जगवावं म्हटलंस
स्वतः हसत असताना
इतरांना हसवावं म्हटलंस

शिकवण अशी आयुष्याची
रोज आठवतो सहर्ष
माणूस म्हणून जगताना
आई तूच माझा आदर्श

© अमोल पाटील
(सन २०१४ मध्ये प्रकाशित 'इंद्रधनुष्य' या काव्यसंग्रहातून)

March 05, 2021

मी देवाला पाहिले | कविता | अमोल पाटील

मी देवाला पाहिले
एका खंबीर मनात
त्या खंबीर मनाची
कृती खंबीरच क्षणात

मी देवाला पाहिले
अशा प्रामाणिक कानात
गर्‍हाणी अवघ्या विश्वाची
पचविती जात येत

मी देवाला पाहिले
अशा कष्टाळू पायात
उभं आयुष्य चालती
जीवनाच्या कर्तव्यात

मी देवाला पाहिले
अशा गोड मुखवाणीत
लळा लाऊनी जीवाला
जगविले सात्विक विचारात

मी देवाला पाहिले
अशा अनोख्या माणसात
ज्याची माणसात राहूनी
होती माणसाला साथ

- अमोल पाटील
(सन २०१४ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'इंद्रधनुष्य' या काव्यसंग्रहातून...)

October 30, 2020

उतराव्या सोनसरी | कविता | अमोल पाटील

जग गर्वाचे आगर
जीव जीवाचाच वैरी
संपाया अंधार येथला
उतराव्या सोनसरी

एक दुःख रे सोसती
अन्नासाठी रे धावती
दूजे श्वान रे पोसती
ज्याला लाखाच्या किंमती

माणूस होउनी रे आला
मन उग्र का रे केले
रक्षक म्हणत होतो ज्याला
त्याच्यात भक्षक मी पाहिले

थांबवा विचार असले
जे भेदाचे उद्गाते 
माणसाचे माणूसपण
श्रेष्ठ कृतीने समजते

नवे सहकार्याचे वारे
सार्‍या जगात वाहू दे
प्रगती समतेने सारी
या विश्वात नांदू दे

©अमोल पाटील
(अमोल पाटील लिखित 'इंद्रधनुष्य' या काव्यसंग्रहातून)

October 06, 2020

खरं प्रेम | कविता | अमोल पाटील

आज प्रेमाचा उत्सव
उभा ठाकला वेगळा
निर्मळतेचा हा झरा
गढूळ केलाया सगळा

खर्‍या प्रेमाची रे व्याख्या
कशी पचणार आज
यांचे क्षणिक विचार
कसा झेपणार त्याग

खर्‍या प्रेमाची रे वाट
त्यागा त्यागाने बनते
असे चारित्र्य माणसाचे
मनामनाला जोडते

येथे गाईचं वासरू
खर्‍या प्रेमाचं हकदार
त्याला माईचं लेकरू
एवढा उरला जोडीदार

प्रेमात गाईच्या माईच्या
वात्सल्य त्यागाचे असते
त्यागावेगळे रे प्रेम
मला स्वार्थच वाटते

सोडूनी स्वार्थ पाखंडी
शरण निस्वार्थाला यावं
त्यागी भावनेच्या मूळाशी
खरं प्रेम ओळखावं

- अमोल पाटील
(सन २०१४ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'इंद्रधनुष्य' या काव्यसंग्रहातून...)

भाकर बोलाया लागली | कविता | अमोल पाटील

सार्‍या जगाच धावणं
हुडकाया पोटाची भाकर
कशी भाकर थांबली
करुनी जगाला चाकर

अशा भाकरीची भूक
अवघ्या सृृष्टीच्या जीवाला
सारे धावती तिजसाठी
भूकेल्याचा ती निवाला

अशा भाकरीची कीर्ती
तिन्ही युगांत पाझरली
मला भाकरीची भीती
काही पोटाना ती विसरली

विसरल्या पोटाची गं किव
भाकरी तुला का येईना
कधी तूही त्यांच्यासाठी
का गं धावत जाईना

तुझं थोर भाकरीपण
ये गं गरिबीच्या दारी
तुझा कितीतरी सत्कार
होईल गरिबीच्या घरी

राजा मी रे काय करू
भाकर बोलाया लागली
माझा होतूया नाईलाज
जरी कितीही धावली

गरिबीकडं धावताना
काही माणसंच येत्यात
गरिबीपस्तूर पोहचताना
तेच मजला खात्यात

भाकर निर्जीवच होती
तिला गरिबीचा कळवळा
येथे सजीवच होते 
सजीवाच्या भूकेचा अडथळा

- अमोल पाटील
(सन २०१४ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'इंद्रधनुष्य' या काव्यसंग्रहातून...)