December 27, 2019

रोजगार | कविता | अमोल पाटील

माणसाच्या जगण्याला
महागाईचाच ताप
नाही रोजगार हाती
अन्नासाठी हापाहाप

गरिबी आणि श्रीमंती
दोघे इरेला पेटल्या
दरी वाढत चालली
नाही समस्या सुटल्या

काही दिस अगोदर
जिणं आनंदाचं होतं
गावं स्वयंपूर्ण होती
मनी समाधान होतं

प्रगतीच्या नावाखाली
लई पाणी वाहून गेलं
प्रगतीच्या उजेडाला
थोडक्यांनीच पाहिलं

क्षणभर रे थांबून
हिच वेळ चिंतनाची
निराधार झालेल्यांना
हात मायेचा देण्याची

पुरे झाली ती भाषणे
कृृृृतीशून्य आश्वासने
काम मिळो प्रत्येकाला
एवढेच गा मागणे

युवकांचा हाच प्रश्न
सगळ्यांनी ओळखावा
त्यांना भीक नको आहे
फक्त रोजगार हवा

- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : 'गीत' नाताळ अंक २०१९)