पेटलेल्या तनामधुनी
थेंब घामाचे गळती
राबणार्या मजुराला
माय धरित्री बोलती
हाती तुझ्या करामत
बंगले किती बांधला
पण अजूनी मजुरा
तू झोपडीत राहिला
नाही कळत नियम
मला तुमच्या जगाचे
मूल्य मातीमोल केले
दररोज मजूरांचे
तूझे हातावरी पोट
तरी मनी भारी दया
आज माणुसकी जीवंत
ही तुझीच किमया
बोल ऐकूनी धरत्रीचे
मजूर वाकला वाकला
डोळ्यातले ओले थेंब
दूर आभाळी फेकला
- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा द्वारा प्रकाशित 'मायमराठी' विशेषांक २०१९)