काय सांगू देवबाप्पा
गरिबाचं रे जगणं
थेंबाथेंबान रगत
जितेपनीच जाळणं
पोटा अन्नाची वानवा
जे मिळेल तेच सोनं
कणसाच्या दाण्यावर
येथे दलालाचं ध्यानं
कडब्यातच राबणं
कडब्यातच राहणं
काडी होऊन एकदा
कडब्यातच जळणं
सारी हयात राबून
शेती रास उगविली
परी राबणार्या पोटा
तिनं नाही शमविली
ऊठ पोशिंद्या जगाच्या
नको फास लावू गळा
तुझ्या मृृृत्यूचाही येथे
कुणा नाही कळवळा
- अमोल पाटील
(पूर्वप्रसिद्धी : ९ वे राज्याव्यापी शिक्षक साहित्य संमेलन (१४ डिसेंबर २०१९) विरार द्वारा प्रकाशित 'शिक्षकांच्या कविता' या काव्यसंग्रहातून...)