October 06, 2020

खरं प्रेम | कविता | अमोल पाटील

आज प्रेमाचा उत्सव
उभा ठाकला वेगळा
निर्मळतेचा हा झरा
गढूळ केलाया सगळा

खर्‍या प्रेमाची रे व्याख्या
कशी पचणार आज
यांचे क्षणिक विचार
कसा झेपणार त्याग

खर्‍या प्रेमाची रे वाट
त्यागा त्यागाने बनते
असे चारित्र्य माणसाचे
मनामनाला जोडते

येथे गाईचं वासरू
खर्‍या प्रेमाचं हकदार
त्याला माईचं लेकरू
एवढा उरला जोडीदार

प्रेमात गाईच्या माईच्या
वात्सल्य त्यागाचे असते
त्यागावेगळे रे प्रेम
मला स्वार्थच वाटते

सोडूनी स्वार्थ पाखंडी
शरण निस्वार्थाला यावं
त्यागी भावनेच्या मूळाशी
खरं प्रेम ओळखावं

- अमोल पाटील
(सन २०१४ मध्ये प्रकाशित अमोल पाटील लिखित 'इंद्रधनुष्य' या काव्यसंग्रहातून...)

No comments:

Post a Comment